मराठी तरुणांना उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांनी व्यवहारांत स्पष्टता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. ‘भीड भीकेची बहीण’ किंवा ‘बोलणार्
याची मातीही खपते,पण न बोलणार्याचे मोतीही खपत नाहीत’, अशा म्हणी मराठी भाषेत असतानाही आपण त्यांचे महत्त्व ओळखत नाही. व्यावसायिकासाठी मुखदुर्बळता नेहमीच नुकसानकारक ठरते. म्हणूनच धंद्याची उमेद असणार्या मराठी तरुणांना माझे पहिले सांगणे असते, ‘मित्रांनो! व्यवसायात निगरगट्ट राहा.’
इतिहासाकडे बघताना मला खूपदा जाणवते, की आपण इंग्रजी भाषा, आधुनिक राहाणी शिकलो, इमाने इतबारे कारकुनी करायला शिकलो, पण इंग्रजांची धूर्त व्यापारी वृत्ती शिकलो असतो तर किती बरे झाले असते! स्वतःची किंमत न ओळखण्याची किंवा वेळप्रसंगी ती किंमत स्पष्टपणे न सांगण्याची चूक मराठी माणसे प्रदीर्घ काळ करत आली आहेत.
याचा एक दुष्परिणाम आजही दिसतो, की उद्योगधंद्यात मराठी माणूस स्वतःची, आपल्या सेवेची किंवा उत्पादनांची किंमत स्पष्टपणे सांगायला कचरतो. आपण बिझनेसमन आहोत, हे लक्षात ठेवले तरच व्यवसायात पुढे जाता येऊ शकेल. पण आणखीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे व्यवहारात स्पष्टता बाळगणे म्हणजे फटकळपणा नव्हे. शहाणपणा व अतिशहाणपणा यात जितके अंतर आहे, तितकेच ते रोखठोक बोलणे व उर्मटपणे बोलण्यात आहे. अनेक मराठी व्यावसायिक याच दुर्गुणामुळे टीकेचे धनी होताना दिसतात.
मी माझ्या व्यवसायात खुर्चीवर बसल्यावर मराठीपण विसरुन निगरगट्ट बनतो. समोरच्याकडून माल विकत घेताना, तो कमीतकमी किंमतीत मिळवण्याबाबत कठोर असतो. मात्र तोच माल ग्राहकांना विकताना मी निर्मळ आणि गोड असतो. यामागे साधे तत्त्व आहे, की मला नफा घेऊनच विक्री करायची असते. अन्यथा स्वतःचा आणि इतरांचा चरितार्थ कसा चालवणार? व्यवहाराची चर्चा किंवा आर्थिक देवाण-घेवाण मी कधीच गुळमुळीतपणे करत नाही, पण तेच माझ्या कामगारांबरोबर वागताना मी स्वतःला त्यांच्यातीलच एक समजून बोलतो. त्यामुळे त्यांना आत्मीयताही वाटते.
Dhananjay Datar