Netbhet
Search by typing & pressing enter

YOUR CART

प्रामाणिकपणाचे बक्षीस

1/14/2016

 
Picture
माझ्या वडिलांनी दुबईत दुकान टाकले आणि मी त्यांना जॉईन झालो. तीन वर्षांनी त्यांनी दुकानाचा कारभार माझ्या हातात सोपवला, पण वेगळ्या पद्धतीने. म्हणजे मी मॅनेजिंग डायरेक्टर होतो, पण मालक ते होते. माझ्या कामाचा ते मला पगार देत असत आणि संपूर्ण धंद्याचा प्रॉफिट स्वतः घेत असत. या व्यवस्थेत खटकण्याजोगे काहीच नव्हते, कारण दुकानात संपूर्ण भांडवल वडिलांच्या स्वकमाईचे गुंतवलेलेले होते.

दरम्यानच्या काळात माझे लग्न झाले. मला दोन मुले झाली. परिवार वाढल्यानंतर माणूस आपोआप उत्पन्नवाढीचे विचार करु लागतो. तसा मीही केला. एक दिवस वडिलांना म्हणालो, "मी इतकी वर्षे निव्वळ पगारावर काम केले आणि प्रत्येक वर्षाला दुकान फायद्यात राखले. पण माझे कुटूंब विस्तारले आहे आणि खर्चही वाढत आहेत. त्यामुळे मला यापुढे दुकानाच्या वार्षिक नफ्यात वाटा मिळण्याची अपेक्षा आहे." वडिलांना माझा हा प्रस्ताव अनपेक्षित असावा. ते सहजपणे बोलून गेले, "हे नवीन काय काढलेस? का बायकोने शिकवले काय रे?" मी काही बोललो नाही.

वडिलांनी रात्री शांतपणे माझ्या मागणीचा विचार केला. मध्यमवर्गीय जीवन जगल्याने संसारी माणसाच्या अडचणी काय असतात, हे त्यांना ठाऊक होते. ते दुसऱ्या दिवशी मला म्हणाले, "तुझा प्रस्ताव मला मान्य आहे, पण मी त्यात दुरुस्ती सुचवतो. गेल्या वर्षभरात आपल्या दुकानाला जो नफा झाला ती बेसलाईन मानू या. हा नफा तू मला दरवर्षी दोन सहामाही हप्त्यांत द्यायचास. त्यापुढे जितका अधिकचा नफा होईल, तो तू खुशाल ठेऊन घे." त्याप्रमाणे पुढे दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आणि मे महिन्यात मी त्यांना ठरलेला नफा देत राहिलो.

वडील मुंबईत अत्यवस्थ असल्याचा फोन आल्यानंतर मी तातडीने दुबईतून निघालो. पण माझी भेट होण्यापूर्वीच दुर्देवाने त्यांचे निधन झाले. आईच्या अंतिम क्षणी तिने माझ्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला होता. वडिलांबाबत मात्र ते माझ्या नशिबात नव्हते. वडिलांच्या अंत्येष्टीच्या गडबडीत असताना घरातील कामवाल्या बाईंनी माझ्या हातात एक डायरी आणून दिली. "धनंजय येताच ही डायरी त्याच्या हातात ठेव," असे वडिलांनी त्यांना बजावले होते. मी ती डायरी वाचण्याच्या मनस्थितीत नव्हतो, पण त्या बाई मात्र पुन्हा पुन्हा मी ती डायरी वाचून बघण्याची विनंती करत होत्या. त्यांच्या समाधानासाठी मी डायरी खिशात घातली आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर वाचेन, असे सांगितले.

रात्री, बालपणापासूनचे वडिलांच्या सहवासातील क्षण आठवताना मला त्या डायरीची आठवण झाली. मी डायरी उघडली. त्यात मी त्यांना दरवर्षी देत असलेल्या नफ्याच्या रकमांचा तारीखवार तपशील नोंदवला होता. शेवटच्या पानावर सर्व नफ्याची टोटल मांडली होती. ती रक्कम वडिलांनी बँकेत ठेवली होती व वारस म्हणून माझी नोंद केली होती. माझे डोळे भरुन आले. व्यवहारी दृष्टीकोन, आर्थिक शिस्त, बचतीचे महत्त्व, तरुण पंखांना झेप घेण्यास वाव देण्याचा मोठेपणा अशा कितीतरी गोष्टी ते न बोलता मला शिकवून गेले होते. जो नफा त्यांचा हक्काचा होता, तोही न खर्चता त्यांनी मला दिला होता. पाठीवरचा मायेने फिरणारा हात अखेरचे विसावतानाही प्रामाणिकपणाचे बक्षीस देऊन गेला होता.

धनंजय दातार


GO BACK TO LIST
CATEGORIES
<<Previous